नगरपालिकेपूर्वीचे पुणे इ. स. १८०० ते १८५६
इ. स. १८०२ हें साल पुण्याच्या इतिहासांत महत्त्वाचे आहे. कारण, पुणे शहरांतील मराठी साम्राज्याचा अस्त जरी पुढे इ. स. १८१७ साली झाला असला तरी इ. स. १८०२ साली अंतिम अवनतीला प्रारंभ झालेला होता. या सालीं यशवंतराव होळकराने पुण्यावर स्वारी केली होती. यशवंतरावाचा बंधु बिटूजी यास दुसन्या बाजीरावानें शिंद्यांकरवी हत्तीच्या पायांखाली देऊन मारविले होते. त्याचा बदला घेण्यासाठी यशवंतरावाने पुण्यावर हल्ला केला. या प्रसंगी बाजीरावाने सात हजार लोकांनिशीं सिंहगडीं प्रयाण केले व तेथून पुण्यांतील इंग्रजांचा वकील कर्नल क्लोज यास निरोप पाठवून या प्रसंगांतून सुटका करा अशी विनंति केली. त्यानंतर या इंग्रज वकिलाने दुसऱ्या बाजीरावास संरक्षण देऊन निवडक १३० लोकांनिशीं वसईस नेऊन पोचविलें. वसईला दि. ३१ डिसेंबर १८०२ रोजी इंग्रज व बाजीराव यांच्यांत तह झाला. हा तह म्हणजे मराठी साम्राज्याच्या मानेभोंवर्ती पडलेला गळफांसच होता. या तहामुळे सुमारें ३० लाख रुपयांच्या वसुलीचा मुलूख इंग्रजांच्या हातांत गेला.
यानंतर दि. १३ मे १८०३ रोजी दुसऱ्या बाजीरावाला इंग्रजांनी मोठ्या समारंभाने पुण्यास गादीवर बसविलें. इ. स. १८०२-०३ सालापासून, पुण्यास नगरपालिका स्थापन होईपर्यंतचा काळ सामाजिक, राजकीय व आर्थिक दृष्टया मोठ्या स्थित्यंतराचा काळ होता. या काळांत पुण्यानें कमालीचें वैभव भोगलें, त्याचप्रमाणें आत्यंतिक विपन्नावस्थाहि अनुभविली. इ. स. १८०३ सालीं पुणे हे महाराष्ट्रांतील व्यापाराचें एक महत्त्वाचें केंद्र होतें. नाना ठिकाणांहून येथे हरतन्हेच्या वस्तू बाजारांत येत. पुण्याच्या या वैभवाचें वर्णन एका तत्कालीन इंग्रज प्रवाशाच्या प्रवास वर्णनांतून मिळते. त्यांत म्हटले आहे, "पुणे ही एक वैभवानें नटलेली आणि व्यापार उदीमानें गजबजलेली नगरी आहे. सरदार दरकदार यांच्या नोकर-चाकरांची, कामें करण्यासाठी शहरभर एकच धांदल असते. सर्व ठिकाणांहून संपत्तीचा प्रवाह पुण्याकडे वाहात येत आहे. इतर राज्यांचे वकील वा पाहुणे येथे राहात असतात.
पेशव्यांना खूष करण्यासाठीं ते बराच खर्च करतात. त्याचप्रमाणे पेशव्यांच्या दरबारी असलेले नोकर-चाकर पेशवे सरकारला नजराणे देतात व या प्रसंगी मिरवणुका काढून सर्व शहर आतषबाजीनें झगझगाटून टाकतात. शहरांत सगळीकडे शस्त्रधारी अनेक लोक इकडून तिकडे मोठ्या ऐटींत जातां-येतांना दिसतात. त्याचप्रमाणें ऐटबाज उमदे घोडे पायांतल्या घुंगरांचा मंद मधुर आवाज करीत हिंडत असतात. रत्नखचित पालख्यांमधून सरदार घराण्यांतील थोर स्त्री-पुरुष रस्त्यांतून जात येत असतात. श्रृंगारलेले मोठमोठे इत्ती रस्त्यांतून मंद गतीनें चालत असतात. तशांत निरोप घेऊन इकडून तिकडे धांवणाऱ्या नोकर-चाकरांची एकच धांदल असते. पुण्याच्या या बैभवांत भर टाकणारी मोठी बाजारपेठ येथे बसलेली आहे. यूरोप, चीनमधून येथे अनेक वस्तू विक्रीस आलेल्या असतात."
