या काळात साऱ्या पुणे नगरावर वैभवाचें तेज झळकत होते. परंतु त्याचबरोवर पुण्यावंर या काळांत कांही आपत्तीहि कोसळल्या होत्या. १८०३ साठी पुण्यास मोठा दुष्काळ पडला. या वर्षी पुण्यास पाऊस चांगला पडला होता व पिकेहि चांगली आली होती. परंतु या साली होळकरांच्या शिपायांनी आपले हत्ती व धोडे पिकांमधून घालून त्या सर्व पिकांचा नाश करून टाकला होता व त्यामुळे या वर्षी पुण्यास मोठा दुष्काळ पडला. या वर्षी चैत्र महिन्यांत पायली तीन दोराची धारण झाली व आश्विनामध्ये एक शेराची धारण झाली. याप्रमाणें ही भयंकर महागाई एक वर्षभर होती. यावेळी मनुष्याने मनुष्याला खाण्याची वेळ आली होती. लोकांना अन्नान्न दशा प्राप्त झाली होती. जरी होळकरांनी पैसा धुऊन नेला होता, तरी येथें कांहीं धनिकांजवळ पैसा होता. परंतु अन्नच नसल्यामुळे कनवटीला पैसा असूनहि लोक 'अन्न अन्न म्हणून प्राण सोडीत होते.
लॉर्ड व्हॅलेटिया हा प्रवासी त्या वेळी पुण्यास आला होता. त्याने येथील परिस्थितीचें जें वर्णन केले आहे तें हृदयद्रावक आहे. तो म्हणतो, "तारीख ९ माहे ऑक्टोबर १८०३ रोजी मी मुंबईहून निघून खंडाळ्यास आलो त्या वेळी एका लहानशा जलाशयाचे कांठीं जो प्रकार पाहिला तो प्रकार भी आजन्म विसरणार नाहीं. काय तो भयानक देखावा ! श्रेष्ठ मानवाची काय ही शोचनीय स्थिति ! त्या जलाशयाच्या जवळ शंभरावर मुडदे पडले होते. त्यांची पोटें त्यांच्या पाठीशी चिकटली होती. त्यांची तोंडे विरूप दिसत असून त्यांवर विलक्षण अवकळा आली होती. त्यांच्या अंगावर वस्त्रे नसून त्यांचे अवयव भयंकर दिसत होते. कांहींजणांनी आपलीं पोटें चिंध्यांनी गच्च जखडून आवळून टाकली होती. कित्येकांस धुगधुगी राहिली असून त्यांच्या तोंडांची उघडझांक चालली होती. कांहीजण शुद्धीवर असूनहि अशक्त झाल्यामुळे कर्दमांतच लोळत पडले होते व त्यांचे डोळे व इतर अवयव यांचे गिधाडे वगैरे भयंकर प्राणी भराभर लचके तोडीत होते. कित्येक स्त्रिया विवस्त्र अवस्थेत पडल्या असून पशुपक्षांनी त्यांची पोट फाडून आंतडी बाहेर काढली होती! कित्येकांचे हात, पाय, मस्तक वगैरे अवयव ठिकाणावर नसून पशुपक्ष्यांनी रानभर ओढून नेलेले होते ! "
जी स्थिति खंडाळ्याच्या आसपास होती तिचीच घनदाढ छाया पुण्याच्या जीवनावर देखील पडली होती. इकडे मुळा-मुठा नदीच्या पृष्ठभागावर अनेक प्रेतें तरंगत होती. शहरावर भयाण अवकळा पसरली होती. या वेळी पेशवाईतील प्रसिद्ध लावणीकार रामजोशी हे पुण्यास होते. त्यांनी या दुष्काळाचे वर्णन एका लावणीत केले आहे, ते अतिशय प्रभावी आहे.
चिन्ह वाढते भिन्न पुढतीं जग किती खिन्न जाहले मनी ।
भिन्न देह किती करिती किती भरती पोटें श्वान कंटाळुनी ।
भनान सारा दनान झाला कणा न पावती सणी ।
कुणास न मिळे भाजी, कुणा रानी करडी मिळे अंबाडी जुनी ।
कढी म्हणती कुणी वरी घालती उडी अन्न पाहुनी ।
रडीयत किती पोरे किती दोरे तैसे ओढीता दारांतुनी ||
जळा पिऊनी किती नळा फुगले पळांत वपु त्यागुनी ।
गळां पडूनी किती रडती किती धरती बाळ मुडदे कवटाळुनी |
क्षुब्ध इतर जे क्षुद्र जयावरि रुद्रकोप या क्षणीं ।
मुडदाड कैचे त्याला भलत्याला भाकर मागती मुख पसरुनी ।
कैकांनी कुटुंबे विष पाजुनी निजविली |
ही दुष्काळाची भली नौबत गाजली ।
पुण्याच्या वैभवाच्या काळांत येथे दुष्काळाने अशा प्रकारें आकांत मांडला होता. त्यामुळे या शहराला वैभवाचे आणि विपन्नावस्थेचे दिवस आलटून पालटून येत होते असे वाटतें. तरी देखील इ. स. १८१७ पर्यंतचे पुण्याचे वैभव हे हेवा वाढण्याजोगें होतें, परंतु दि. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी शनवारवाड्यावरील मराठ्यांचा जरीपटका खाली आला आणि तेथून पुण्याच्या जीवनातील अवनतीच्या कालखण्डास सुरवात झाली.
