इ. स. १७१३ सालीं बाळाजी विश्वनाथ हे शाहूमहाराजांचे पंतप्रधान वा पेशवे झाले. त्यावेळीं पुणे भाग हा निंबाळकरांचे प्रशासक श्री. बाजी कदम यांच्या ताब्यांत होता. बाळाजी विश्वनाथांनी त्यांच्याकडून वाटाघाटी करून हा भाग शाहूमहाराजांच्या ताब्यांत बेतला. त्यानंतर इ. स. १७२० मध्ये शाहू महाराजांना दिल्लीचे मोंगल बादशहाकडून सनद मिळाली य मोंगलांचे मांडलिंक म्हणून शाहू महाराजांनी पेशव्यांच्या मार्फत मराठी मुलखाचा कारभार पाहावयास सुरुवात केली. इ. स. १७२० मध्ये पहिले बाजीराव पेशवे झाल्यावर त्यांनीं पुणे हीच आपली राजधानी केली. त्यानंतर पुण्याचें ऐतिहासिक महत्त्व वाढीला लागले. कारण साऱ्या महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास या शहरांत घडू लागला.
इ. स. १७३१ मध्ये पहिल्या बाजीरावाने शनवारवाडा बांधला. इ. स. १७३१ ते १७६० पर्यंत शहराची भरभराट वेगानें होत गेली. इ. स. १७६१ मध्ये मराठ्यांना पानिपतला फार मोठा पराभव खावा लागला. मराठी साम्राज्य कांहीं काळ जवळ जवळ कोसळलें होतें. सगळीकडे अव्यवस्था निर्माण झाली होती. या परिस्थितीचा फायदा घेऊन इ. स. १७६३ साल निजामानें पुण्यावर हल्ला करून हे शहर लुटलें, जाळपोळ केली व लोकांवर अनन्वित अत्याचार केले. या पराभवाचें उट्टे काढण्यासाठी मराठे सरदार एकत्र आले आणि त्यांनीं इ. स. १७६५ सालीं राक्षसभुवन येथें निजामाला चांगलेंच पराभूत केले. इ. स. १७६५ ते १७९५ पर्यंतचा माधवरावांच्या कारकीर्दीचा काळ हा पुण्याच्या इतिहासांतील सर्वोत वैभवशाली काळ होता. पानिपतच्या पराभवामुळे खचून गेलेले मराठा मन या काळांत पुन्हा सामर्थ्यशाली बनूं लागले. नव्या आशाआकांक्षा त्यांच्या मनांत फुलू लागल्या. नवा मुलूख ते आपल्या ताब्यांत आणूं लागले. परंतु हा ३० वर्षीचा काळ असा जातो न जातो तोंच १७९५ सालीं सवाई माधवरावांनी आत्महत्या केली आणि दुसरे बाजीराव गादीवर आले. इ. स. १७९५ ते १८१८ हा काळ पुण्याच्या जीवनांतील पडता काळ आहे. इ.स. १७९७ मध्ये सर्जेराव घाटगे यांनी नाना फडणिसाला अटक केली व सारे शहर लुटलें. इ. स. १८०० सालीं पेशव्यांच्या दरबारांतील हा बुद्धिमान् पुरुष - 'नाना' - निधन पावल्या नंतर पेशव्यांचा राज्यावरील ताबा अधिकच ढिला होऊन अंतिम ऱ्हासाला सुरवात झाली.
इ. स. १८०२ साली यशवंतराव होळकर यांनी आपल्या बंधूच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठीं पुणे शहर लुटलें. त्या वेळीं दुसरा बाजीराव पळून इंग्रजांच्या आश्रयाला गेला व त्यानें त्यांच्याशीं करार केला. या कराराच्या वेळीं, खरै म्हणजे, त्यानें मराठी राज्यावर उदकच सोडलें होतें. इ. स. १८०३ ते १८१७ पर्यंत मराठी राज्य टिकून होतें. परंतु या काळांत मराठी राज्य झपाट्यानें इंग्रजांच्या प्रभुत्वाखालीं जात होते. शेवटी १७ नोव्हेंबर १८१७ रोजी मराठी राज्यानें आपला शेवटचा निःश्वास सोडला. येथून पुढे येथें इंग्रजी राज्याला सुरुवात झाली.
