राजकीय पक्ष l Political Party


राजकीय पक्षांमुळे नगरपालिकेच्या जीवनांत कसकशी स्थित्यंतरे झाली, हे पाहण्यासारखें आहे. नगरपालिकेतील राजकीय पक्षांची बदलती स्वरुपें अभ्यासतांना एक गोष्ट सदैव दृष्टीसमोर ठेवणें जरूर आहे. कांटेकोर अर्थाने वा शास्त्रीय दृष्टिकोनाप्रमाणे नगरपालिकांमध्यें राजकीय पक्ष असे तयार झालेले नव्हते. विशिष्ट राजकीय तत्वज्ञान आणि अन्तर्गत लोकशाही हीं राजकीय पक्षाचीं दोन प्रमुख वैशिष्ट्ये असतात. १९३८ साली काँग्रेस पक्षाने अधिकृत रीत्या प्रथम पुर्णे नगरपालिकेच्या निवडणुका लढविल्या. तत्पूर्वी राजकीय पक्ष अधिकृत रीत्या या क्षेत्रांत पडले नव्हते. त्यामुळे येथे जरी राजकीय पक्षांप्रमाणे सभासदांचे वर्गीकरण केलेले असले तरी 'राजकीय पक्ष' हा शब्दप्रयोग अत्यंत स्थूल अर्थाने वापरला आहे. सभासदांच्या मनाचा विशिष्ट राजकीय प्रणालीकडे झुकलेला कल, नगरपालिकेमधील विविध प्रश्न सोडवितांना विविध पक्षांशी केलेले सहकार्य इत्यादि गोष्टी विचारांत घेऊन ढोबळ मानानें सभासदांचा राजकीय पक्ष ठरविला आहे.

Post a Comment