ब्राम्हणेतर पक्ष १९२१ मध्ये संघटित रीत्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यांत उतरला. श्री. केशवराव जेधे व श्री. जवळकर यांच्याकडे या पक्षाचें नेतृत्व होतें. हा पक्ष १९२१ ते १९३८ पर्यंत एक गट म्हणून कार्य करीत होता.
पूर्वी म्हटल्याप्रमाणे १९२० च्या माँटेग्यू-चेम्स्फर्ड मुधारणांनुसार मतदारांचें क्षेत्र वाढलें होतें. त्यामध्यें ब्राह्मणेतर वर्गातील नागरिकांचा समावेश मोठ्या संख्येनें झाला होता व त्यामुळे त्यांना आपले प्रतिनिधी निवडून आणणे सोपें गेलें. शिवाय १८८३ ते १९२० पर्यंत त्या समाजांतील सभासद नगरपालिकेमध्यें अल्प संख्येनें होतेच. या पार्श्वभूममुळें या संघटनेला आपली सभासदसंख्या वाढविणे फारसें कठीण गेलें नाहीं.
परंतु १९३८ सालीं ही संघटना विस्कळित झाली. १९३० नंतर राष्ट्रीय चळवळ जोमानें फोफावूं लागली. राष्ट्रवादानें जनमनाची पकड घेतली. ब्राह्मणेतर पक्षांचा ब्राह्मणांना जेवढा विरोध आहे तेवढा परकीय ब्रिटिश सरकारलाहि नाहीं, ही भावना कांहीं तरुण मंडळींच्या मनांत घर करूं लागली. वर्धिष्णु राष्ट्रवादी भावनेशीं हा ब्राह्मणद्वेष जुळणारा नव्हता, त्यामुळे या संघटनेबद्दल असंतोष बाढूं लागला. याच काळांत पुणे नगरपालिकेतील या पक्षाचे धुरीण श्री. केशवराव जेधे हे राष्ट्रीय काँग्रेसला मिळाले. त्यानंतर दुसरे नेते श्री. जवळकर हे दिवंगत झाले, त्यामुळे हा पक्ष कमजोर बनूं लागला. १९३७ च्या प्रांतिक सरकारच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रांत काँग्रेसला अनुकूल असे वातावरण तयार झालें, १९३८ साली काँग्रेसने पुणे नगरपालिकेच्या निवडणुकींत या संघटनेचा पराभव केला.
१९२१ च्या पूर्वी बहुजनसमाजाच्या पेठांत पुणे नगरपालिकेनें फारशा सुधारणा केल्या नाहीत; पाणीपुरवठा, रस्ते-दुरुस्ती, शाळा, दिवाबत्ती, दवाखाने इत्यादि सुधारणा या प्रायःशहराच्या पुढारलेल्या वर्गाच्या भागांतच झालेल्या आहेत, ' असें म्हणणें या पक्षानें मांडलें होतें. 'पूर्व-पश्चिम बाद' म्हणून हा बाद पुण्यांत त्या वेळीं प्रसिद्ध होता. परंतु १९२१ ते १९३८ या काळांत अंदाजपत्रक तयार करतांना उपेक्षित भागांत जास्तीत जास्त सुधारणा करण्याकडे लक्ष दिलें गेलें.
१९२१ नंतर हिंदु महासभा पुणे नगरपालिकेच्या जीवनांत प्रविष्ट झाली. श्री. ल. ब. भोपटकर हे या पक्षाचे अध्वर्यु होते. मुसलमानांना जातीय तत्त्वावर कांहीं जागा 'राखीवं' म्हणून दिल्या गेल्या. अंदाजपत्रके तयार करतांना व दैनंदिन कारभार हाकतांना अल्पसंख्याक म्हणून मुसल्मानांना अवास्तव सवलती मिळत आहेत, अशी तक्रार या संघटनेनें नागरिकांसमोर मांडली. या पक्षाच्या सभासदसंख्येंत फार मोठीं स्थित्यंतरे झाली नाहींत. १९४६ च्या निवडणुकीत मात्र हा पक्ष पुष्कळच निष्प्रभ ठरला. या नंतरच्या काळांतहि या पक्षाचें गेलेलें सामर्थ्य पुन्हा परत आलें नाहीं.
